Thursday, May 9, 2019

sikkim with saraswati engineering college kharghar navi mumbai

मुंबईहून सकाळी 11 च्या दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस वरून न्यू जलपाईगुडी पर्यंत कधी sunrise तर कधी sunset बघत कधी पत्ते खेळत तर कधी गाण्यांच्या भेंड्या खेळत असा साधारण 44 तास प्रवास आपल्या भारतीय रेल्वेने करत , पुढे सहा तासांचा रस्त्यांच्या आजुबाजूस हिरव्यागार झाडाझुडपांनी नटलेले उंच पर्वत, खळखळ वाहणारी तिस्ता नदी, वाहणारा थंड वारा सहन करत बस प्रवास करून सिक्किमची राजधानी गंगटोकला आलो. शांत व स्वच्छ गंगटोक शहर म्युझियममध्ये ठेवण्यासारखेच वाटते...
उंच पर्वतावर वसलेले असल्याने गंगटोक शहर उंचसखल जमिनीवर बांधलेल्या घरांतून नांदते आहे. शेजारच्या घरी जायचे असेल तरी कित्येकदा शे-पन्नास पायर्‍या चढाव्या-उतराव्या लागतात. मुख्य रस्ते अरुंद आणि वर्दळीचे आहेत मारूती व्हॅन, अल्टो अशा प्रकारच्या चार चाकी वाहनांनाच केवळ "टॅक्सी" म्हणून वाहतूक करण्यास परवानगी होती. उतारचढावाचे रस्ते असल्याने एखादी गाडी जरी उभी राहिली, तर रस्त्यातील वाहतूक तुंबून राहणार यात तिळमात्र शंका नाही याकरता रस्त्यांवर कुठेही टॅक्सी उभी करण्यास मनाई होती. टॅक्सी विवक्षित जागीच उभी करावी लागत असे.

तीन दिवसांच्या मुक्कामात गणेश टोक वरून बर्फाच्छादीत कांचनगंगा शिखराचे दर्शन घेतले. आर्किड फ्लॉवरशो संग्रहालयात फुलांच्या विविध जाती पाहिल्या व तिबेटीयन रिसर्च इन्स्टिट्यूटला भेट देऊन थंग पेंटिंग व विणकाम प्रत्यक्ष पाहिले. ताशी ह्यू पॉईंट, रिव्हर फॉल्स गार्डन आदी प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. चौदा हजार पाचशे फूट उंचीवर असणाऱ्या कडाक्याच्या थंडीत, सुसाट वाऱ्यात, दुर्गम भागातील सीमेवर दक्ष असणाऱ्या भारतीय जवानांशी गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत आम्ही फोटोही काढले. आम्हा सर्वांची मने देशभक्तीने भरून आली. परतीच्या प्रवासात सैनिकांनीच बांधलेल्या बाबा हरबजनसिंग मंदिराला भेट दिली. असे सांगतात की लढाईत गायब झालेले हे वीर सेनानी अदृश्यपणे वावरत असून संकटकाळी सीमेवरील सैनिकांना धोक्याची सूचना देतात. वाटेत बारा फूट उंचीवर असणारे सुंदर व पवित्र छंगू लेक पाहिले. तलावाच्या काही दुमीर्ळ अशा याकच्या पाठीवर स्वार होऊन फेरफटका मारला. सिक्कीम राज्याचे मुलायम सृष्टीसौंदर्य डोळ्यात साठवत तिस्ता नदीच्या काठाने तर मध्ये नदीच्या पात्रातून राफ्टिंग करत दाजिर्लिंगकडे निघालो.
दार्जिलिंग ला आम्ही ज्या हॉटेलात उतरलो होतो त्या हॉटेलचे प्रवेशद्वार रस्त्यावर तळ मजल्यावर आहे. प्रवेशाशी उभे राहून हॉटेलकडे पाहिले असता ते एक मजली भासते. आम्ही ज्या खोलीत राहिलो होतो त्या खोलीत जाण्याकरता स्वागत-कक्षापासून दोन मजला खाली जावे लागे. खोलीतील खिडकीतून एक रस्ता दिसे. तो हॉटेलच्या पाठीमागचाच रस्ता होता. मात्र मी त्या रस्त्यावर जाऊन पाहिले तेव्हा आमची खोली दुसर्‍या मजल्यावर दिसत होती. इथे सर्वसाधारणपणे सर्वच घरांचे बांधकाम असेच असते
कांचनगंगा पर्वतराजीच्या कुशीतील 'क्वीन ऑफ हिल्स' पाहून मन प्रसन्न झाले. येथे पहाटे चार वाजता कडक थंडीत झोपेतून उठून 'टायगर पॉईंट'वरून सनराईज पहाणे एक नयनरम्य सोहळा असतो. बर्फाच्छादीत पर्वत शिखरांवर जणू सुवर्णाचा अभिषेक होतो आहे, असे वाटते..
दार्जिलिंगची हिमालयन रेल्वे हे अभियांत्रिकी कौशल्याचे एक चिरंतन स्मारक आहे. इसवी सनाच्या १८७९ मधे घातलेल्या रुळांवरून आजही ती दिमाखात धावत असते. तिला विश्व-संस्कृतिक-वारसा असण्याचा सन्मान प्राप्त झालेला आहे. दार्जिलिंग शहरात उंचीवरच्या स्थानकांपर्यंत पोहोचण्याकरता आगगाडी जेव्हा इंग्रजी आठच्या आकाराच्या लोहमार्गांवरून वेगाने जात असते तेव्हा ती अत्यंत प्रेक्षणीय भासते. तिचा डौल तो काय वर्णावा. दार्जिलिंग शहरात तिची "दार्जिलिंग" आणि "घूम" ही स्थानके आम्ही थांबून पाहिली. दार्जिलिंग हे अंतिम स्थानक आहे. या लोहमार्गासोबतच डांबरी सडकही हातात हात घालून चालत असते. याचाच उपयोग ’आराधना’ सिनेमातील सदाबहार गीतात करून घेतलेला आहे. जीपने प्रवास करणार्‍या राजेश खन्नावर चित्रित करण्यात आलेले "मेरे सपनों की रानी कब आयेगी तू, बीत जाये जिंदगानी कब आयेगी तू" हे गीत, याच गाडीत बसून प्रवास करणार्‍या शर्मिला टागोरला उद्देशून म्हटले गेलेले आहे. त्याची चित्रफीत पाहिल्यासही या रेल्वेची खरीखुरी गंमत लक्षात येऊ शकेल त्या नंतर में हु ना या सिनेमामध्ये देखील याचा वापर झाला आहे.
हिमालयन म्युझियम तिबेटी मदत केंद्र, चहाचे मळे, खरेदीसाठी गजबजलेला बिग बाजार चा चौरस्ता, शहरातून फिरणारी मिनी ट्रेन, प्रसन्न चेहऱ्याचे नगरवासी, गुलाबी थँडी या सर्व गोष्टींचा अनुभव घेण्यासारखा आहे....
सायंकाळी सर्वांच्या आग्रहाखातर नवीन वर्षाची आनंदी सुरुवात म्हणून dj पार्टी आयोजित केली हॉटेल च्या बाहेर कसलाही आवाज जाऊ नये याची काळजी घेऊन संपूर्ण जल्लोषात पार्टी पार पाडली
अखेरच्या दिवशी आपल्या गंगटोक आणि दार्जिलिंग मधल्या आठवणींच्या सुटकेस भरून सर्वाना घेऊन आपआपल्या बस मध्ये बसून न्यू जलपाईगुडी कडे परतीचा प्रवास चालू केला मध्यरात्री 1.30 च्या सुमारास दाट धुक्याना बाजूला सारत आलेल्या कामाख्या एक्सप्रेस ने लोकमान्य टिळक टर्मिनस च्या दिशेने प्रवास सुरु झाला...

sikkim with saraswati engineering college kharghar navi mumbai

मुंबईहून सकाळी 11 च्या दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस वरून न्यू जलपाईगुडी पर्यंत कधी sunrise तर कधी sunset बघत कधी पत्ते खेळत तर कधी गाण्यां...